संस्थेबद्दल माहिती

श्रीचैतन्येश्वराचे भव्य मंदिर

श्री क्षेत्र आंभोरा देवस्थान हे पाच नद्यांच्या संगमावर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. तपश्चर्येच्या दृष्टीने फार महत्वाचे स्थान आहे. श्रीहरीनाथांनी येथेच तपश्चर्या करून बारा वर्षे महाकठीण असे अनुष्ठान केले होते. त्या अनुष्ठानाच्या शेवटी त्यांनी साक्षात श्रीशंकराला प्रसन्न करून घेतले. त्यावेळी प्रसाद स्वरूपी श्रीचैतन्येश्वर हे शिवलींग या स्वयंभू यज्ञकुंडातून निघाले. येथे टेकडीवर श्रीचैतन्येश्वराचे भव्य मंदिर आहे. भगवान चैतन्येश्वरच पंचक्रोशीतल्या लोकांचा दैवत आहे. येथे श्रीहरिनाथ व त्यांचे शिष्य श्रीरामचंद्र महाराज या दोघांची संजीवन समाधी आहे. जे मराठीचे आद्यकवी श्रीमुकुंदराज यांचे गुरू आहेत. तसेच प. पूज्य स्वामी रंगलालजी नागदा यांचे सुद्धा समाधी मंदिर आहे. नेपाळच्या राजाच्या मुलाने सुद्धा येथे तपश्चर्या केलेली आहे व त्याची समाधी सुद्धा येथेच आहे. गणपती, गंगेचे, विठ्ठलाचे फार प्राचीन मंदिर येथे आहेत. किंबहूना शारंगधर राजाची राजधानी सुद्धा येथेच होती; आणि त्याचे अवशेष अजूनही येथे कायम आहेत. श्रीक्षेत्र आंभोरा हे आध्यात्मिकदृष्ट्या फार मोठे व महत्वाचे स्थान आहे. त्या दृष्टीने येथे भाविकांच्या सोयीकरिता भव्य वास्तू आहेत. भाविकांची गर्दी पाहता आगामी योजना आखून त्याला मोठे प्रारूप देण्याचा आमचा मनोदय आहे.

विदर्भातील प्रसिद्ध उद्योगपती श्रीमान रत्नाकरजी ठवकर रा. नागपूर यांनी या देवस्थानाला फार मोठी देणगी देऊन जिर्णोधारात फार मोठे सहकार्य दिलेले आहे. एवढेच नव्हे तर आद्यकवी श्री स्वामी मुकुंदराज कृत “विवेकसिंधू” हा ग्रंथ देवस्थान मंडळांने मोठ्या परिश्रमातून भाविकांना उपलब्ध करून दिला आहे.

श्री क्षेत्र आंभोरा देवस्थानाचे सचिव स्व. श्री. पुर्णचंद्र साळवे यांनी श्री. वसंत चन्ने (भंडारा) यांना २००५ मध्ये विवेकसिंधू बद्दल ‘शोध आणि सत्यता’ यांवर पुस्तक लिहायला सांगितले होते. ते पुस्तक आज ‘विवेकसिंधू’ संबंधी संपूर्ण शोधग्रंथ म्हणून ‘मुलारंभ’ या नावाने तयार केलेले आहे. अलिकडेच या ग्रंथाचे प्रकाशन झालेले आहे. आणि त्या शोध ग्रंथाच्या प्रती आंभोरा येथे विक्रीस उपलब्ध आहेत.

या ग्रंथाचे आपण वाचन व पारायण करावे व आपला अभिप्राय, आपल्या सुचना आणि आपल्या अनुभूती सुद्धा आम्हाला अवश्य कळवाव्यात.
” भगवान श्रीचैतन्येश्वर आपणा सर्वांना दीर्घ आयुरारोग्य देवो व आपल्या मनोकामना पूर्ण करो, ही शुभेच्छा ! “